निर्गुणाच्या शोधातली अंतर्यात्रा
चल दिला, चल ओथे चलिए जित्थे सारे अन्हें न कोई साडी जात पछाणे न कोई सानूं मन्ने ।
निर्गुणाच्या शोधातली अंतर्यात्रा
चल दिला, चल ओथे चलिए जित्थे सारे अन्हें न कोई साडी जात पछाणे न कोई सानूं मन्ने ।
गोमंतकाने मला जे शिकविले ते खचितच कुठल्या पुस्तकाने शिकविले असेल. टिमटिमणाऱ्या ताऱ्यांच्या खाली समुद्रकिनाऱ्यावर झोपून निसर्गाचा अफाट पसारा पाहताना व लाटांचे संगीत ऐकताना, छोट्याश्या खेकड्यांची धावपळ, किनाऱ्यावरती शिंपले गोळा करताना होणारी आनंद अनुभूती आणि एकाग्रता शब्दात मांडू शकत नाही.

रोज रोज त्याच त्या किनाऱ्यावर जाऊन देखील लाटा आणि त्यांचा खेळ मात्र नवे दृश्य दाखवायचा. कधी किनारा मागे हटायचा तर कधी समुद्र मागे जायचा. पश्चिमेकडे सूर्य देवता निरोप द्यायचा तर पूर्वेकडून जंगलाच्या वरती चंद्र नदीला त्याच्या रुपेरी रूपाने झळाळून टाकायचा. इकडे राहायला आल्यावर दोन महिन्यांत वडिलांनी आपला देह सोडलेला होता. त्यामुळे बऱ्याच संध्याकाळी त्यांच्या आठवणीतच गेल्या. अचानक एक पोकळी निर्माण झाली ती कायमचीच. सगळ्यांपासून दूर गेल्यावर आपण आपली ओळख देखील विसरून जातो. ना कोणी नातेवाईक, ना मित्र परिवार. जन्मजात चिकटलेली आणि काही आपण स्वतः निर्माण केलेली नाती नवीन ठिकाणी विरघळून जातात आणि मग आपण आपल्याला नव्याने पाहू लागतो.
गोमंतकाचे वैशिष्ट्य असे कि येथे तुम्हाला कोणी उगाचच प्रश्न विचारीत नाही. तुम्ही कुठल्या धर्माचे, असेच कपडे का घातले, अंघोळ केली कि तसेच उठून आलात ? काही नाही ! एक माणूस म्हणून तुम्ही या अफाट किनाऱ्यावरती उभे असता, तुमच्या आसपास रशियन, ब्रिटिश, दिल्लीवाले, मराठी, केरळी अशी कुठलीही माणसे असू शकतात. एखादी एकटी स्त्री आणि तिच्यासोबत तिचे बाळ, एखादा तरुण आणि सोबत त्याचा कुत्रा कधी कधी फक्त स्थानिक मासेमारी करणारे आणि लाटा. जो तो आपापल्या उत्सवात दंग. एकमेकांकडे पाहून हसून पुन्हा आपल्या कामात व्यग्र.

येथे तुम्ही फक्त एक माणूस असता. कोणी काय घातले किंवा नाही या फंदात कोणी पडत नाही आणि मग आपला अहंकार, जातपात, संसारातील स्थान सगळे मागे राहते. हो स्त्रिया आल्यावर पुरुषांच्या डोळ्यातल्या चमकेने आणि वळलेल्या मानेतून स्त्री आणि पुरुष हा भेद कधी दिसतो. नाहीतर बहुतांशी तो ही संपून सगळी माणसे आनंदात आपला वेळ घालवतात. कोणी लाटांसोबत बेभान नाचते, कोणी कॅमेऱ्यासमोर पोझ देत असते, मुले वाळूचा किल्ला करतात, तरुणाई बिअरच्या बाटल्यासोबत सूर्याला बाय-बाय करतात. एखादा समुद्र गरुड भक्ष्याच्या शोधात उंचावर घिरट्या घालीत असतो तर एक खंड्या पक्षी त्याच त्या लाकडावर आसनस्थ होऊन रोज समुद्राकडे टक लावून पाहताना दिसतो.
समुद्राच्या ऊर्जेने आपले मागचे सगळे विसरून पुन्हा एकदा मी नवा कोरा होतो. प्रत्येकाला इथे जे मिळते ते कदाचित आपल्या घरी / गावी / शहरी मिळत नाही. म्हणूनच लोक गोव्याचा प्लॅन करीत असावेत. मला देखील या भूमी आणि सागराच्या संगमावर जे काही गवसले ते निश्चितच अमूल्य होय.

जेव्हा केव्हा मी फिरायला जातो तेव्हा हेडफोन लावून गाणी ऐकतो. संध्याकाळी सूर्यास्त जेव्हा होतो त्या कातरवेळी बाबा बुल्ले शाह यांचे चल दिला हे गीत ऐकले कि एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते. त्यांचे ते हृदयातून उमटलेले बोल मला कुठेतरी सार्वत्रिक मानवाची हाक वाटते. आपला शोध नेमका कसला आहे मनाच्या तळातून ती हाक पुन्हा एकदा वरती येतो. पैसे, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे हवे आहेत पण त्यात गुरफटून “ मी “ कोण होतो , माझी लहानपणीची स्वप्ने काय होती याचा आवाज जो दबलेला असतो तो पुन्हा ऐकू येतो.
लहानपणापासून धार्मिक, कर्मठ, अध्यात्मिक आणि दांभिक अश्या सर्व लोकांशी संबंध आल्याने मला आता कुठल्याही तत्वज्ञानापेक्षा आपल्याच कामात तल्लीन असलेला मासेमार किंवा तो खंड्या पक्षी जास्त नैसर्गिक वाटतात. दैनंदिन आयुष्यपलीकडे कदाचित ते झेप घेऊ शकत नसतील परंतु आयुष्याला असलेली त्यांची एक लय आणि शांतता मला आकृष्ट करते. जीवनात तत्वज्ञान हे जर जेमतेम ५ हजार वर्षांपूर्वी आले असेल. मानवी आयुष्य, त्याचा संघर्ष साधारणतः १,००,००० वर्षांचा आहे. मग कल्पना करा एवढी सगळी शतके मानव कशाच्या आधारावर जगाला असेल ? भीतीपोटी उपजलेले सहकार्य कि प्रेम भावना, महत्वाकांक्षा कि कल्पनाशक्ती ? आणि या सगळ्या प्रवासात शेतीमुळे स्थिरता मिळाल्यावर करकचून बांधणारी व्यवस्था तयार केल्यावर निर्माण झालेले जगड्व्याळ ( गुंतागुंतीचे ) तत्वज्ञान… अजबच आहे कि नाही ?
पण जेव्हा आपल्या मनाची हाक संतांच्या कवितेद्वारे ऐकू येते तेव्हा ते शब्द दुःखावरचा मलम वाटतात. सिंध पंजाबच्या वाळवंटी भागातून उमटणारे ४०० वर्षांपूर्वीचे शब्द गोमंतकाच्या किनाऱ्यावर तेवढेच जवळचे वाटतात जसे महाराष्ट्रातून घुमानला ( पंजाब ) पाझरलेली संत नामदेवांची वाणी. संतांची हाक खरोखरीच वैश्विक असते ना ? कुठलेही कर्मकांड नाही, कुठल्या रंगाचे कपडे, टोपी, दाढी, मिशा वाढवायची गरज नाही. फक्त मानव असणे गरजेचे. परदेशी लोक जेव्हा या किनाऱ्यावर येऊन मस्तीत नाचतात, मावळत्या सूर्यासोबत ध्यानस्थ होतात तेव्हा मला तेही तेवढेच आस्तिक आणि भारतीय वाटतात जेवढा आपल्या येथील ध्यान करणारी व्यक्ती. रंग आणि पासपोर्ट यांच्या पलीकडे त्यांच्या अंतरंगीची ओढ त्यांना या भूमीकडे ओढते.

तुमच्या हृदयाला कदाचित पर्वत,वाळवंट किंवा एखाद्या एकांत कोपऱ्याची ओढ असेल. तिला नाकारू नका. सांसारिक जबादारी पार पडणे जितके जरुरी तितकेच अंतरीची ओढही महत्वाची. स्वतःचा अनुभव हा दुसऱ्याच्या शब्दापेक्षा कधीही सरस कारण तो आपला स्वतःच असतो.
एकपेशीय जीवापासून सुरु झालेला प्रवास आज आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या जीवापर्यंत झाला म्हणजे या सृष्टीचा हा सारा पसारा उगाचच तर नक्की नाही. आणि लीला म्हणावी तर मग त्यात आपला फक्त एक खेळाडू किंवा पात्र.समुद्र किनाऱ्यावरच्या लाटा पाहिल्यावर मात्र आयुष्य हा खरोखरीच एक खेळ वाटतो. एका मागोमाग एक लाट येते. तिच्यात कोणताही अभिमान दिसत नाही. पूर्णपणे जोशात येऊन ती किनाऱ्यावर आपटते व विरघळून जाते. तेच पाणी जर आपल्यात आहे मग आपणही का नाही आयुष्याचा खेळ खेळावा ? कधी हसत तर कधी रडत परंतु हा खेळच आहे हे समजून आयुष्य जगावे.
माझा हा कोपरा मला रोज नवे जीवन देतो. जेथे मला मी असल्याचा आनंद वाटतो कोणत्याही नात्यात, जबाबदारीत न चिकटता स्वतःच्या असण्याचा उत्सव मी रोज समुद्राच्या साक्षीने कधी बुल्ले शाह, तुकाराम महाराज, कबीर महाराज, गोरक्ष नाथ तर कार्ल युंग, खालील जिब्रान, ओशो यांच्या सोबत चालतो. समुद्रावरच्या लाटा आणि त्यांचे शब्द मनाला शांत करीत नेहमी सांगतात
चल चल दिलिया ओथे चलिए जित्थे ना अन्हेरा, ना चानण जित्थे चुप्प वी बोलदी है जित्थे होणा ई काफ़ी है । चल दिला, चल चल दिलिया, चल ओथे… ओथे… चलिए…
लेखन : Yogesh Kardile
छायाचित्र : के रागिणी योगेश
메타데이터
- post_id
- f5d79930e101
- slug
- निर्गुणाच्या-शोधातली-अंतर्यात्रा-f5d79930e101
- url
- https://medium.com/@yogeshkardile/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-f5d79930e101
- canonical_url
- https://medium.com/@yogeshkardile/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-f5d79930e101
- author_url
- https://medium.com/@yogeshkardile
- status
- ok
- fetched_at
- 2026-07-26 01:50:08